टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जिल्ह्यात आलेले असतानाही त्यांच्या संपूर्ण दौऱ्यास श्री विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी दांडी मारली असल्याचे वृत्त आजच्या दिव्य मराठीने प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही भगीरथ भालके यांना बाजूला सारून पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सोमवारी माढा तालुका दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पवारांच्या दौऱ्यात हजर होते. विशेष म्हणजे जे नेते पक्ष सोडणार अशी चर्चा होती ते नेतेसुद्धा पवारांच्या स्वागताला बुके घेऊन हजर होते.
भाजपच्या वाटेवर असल्याची ज्यांची चर्चा आहे, ते विठ्ठल सहकारीचे अध्यक्ष अभिजित पाटील हेसुद्धा या दौऱ्यात उपस्थित होते. मात्र श्री विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी या दौऱ्याला दांडी मारली. ते कुठे होते याविषयी कार्यकर्त्यांनाही कल्पना नव्हती.
पक्षाचे सर्वोच्च नेते जिल्ह्यात येत असतानाही भगीरथ भालके अथवा त्यांचे निकटवर्तीय कोणीही समर्थक उपस्थित नव्हते, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भालकेच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. केवळ दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव म्हणूनच भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत अगदी निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला.
भगीरथ भालके यांच्या निष्क्रियतेमुळेच पक्षाला हक्काची जागा गमवावी लागली, असा एकूण अहवाल पक्षाच्या नेत्यांकडे गेलेला होता. त्यानंतर श्री विठ्ठल सहकारीच्या कारभाराबाबतही भगीरथ भालके यांच्याविषयी असंख्य तक्रारी पक्षाच्या नेत्यांकडे गेल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतही भगीरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या स्थानी फेकले गेले. याशिवाय भगीरथ भालके पक्षाच्या कार्यक्रमासही वेळ देत नाहीत.
लोकांशी त्यांचा फारसा संपर्क नाही, अशा तक्रारींचा सूर वाढत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा नाद सोडून पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे दिसते.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग निर्णायक आहे.
अजित पवार यांच्या अनगर दौऱ्यातही तोंडदेखली हजेरी
तीन महिन्यांपूर्वी अनगर (ता.मोहोळ) येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्यास भगीरथ भालके उशिरा गेले . तोंडदेखली हजेरी लावून अजित पवारांचा दौरा अर्धवट सोडून भालके सर्वात अगोदर परतही निघून गेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.
अभिजित पाटील यांचे राष्ट्रवादीशी अद्यापही सलोख्याचे आहेत संबंध
आज भाजपात असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक हेसुद्धा वेळप्रसंगी राष्ट्रवादीच्या संपर्कात असतात. पंढरपूर तालुक्यात वेगाने प्रगती करीत असलेले युवा नेते अशी प्रतिमा असणारे अभिजित पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत नेहमी जवळीक राखलेली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज