टीम मंगळवेढा टाईम्स ।
आजच्या राजपथावर होणाऱ्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने वारकरी संतपरंपरे वर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथामध्ये मंगळवेढ्यातील तीन संताचा समावेश आहे.
यवतमाळ व टीमचे रोशन इंगोले आणि तुषार प्रधान यांनी चित्ररथाची संकल्पना व चित्र तयार केले आहे.
कला दिग्दर्शक म्हणून नरेश चराडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 कलाकारांच्या सहकार्याने तयार केलेल्या चित्ररथात संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले.
संत परंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ दर्शवण्यात आला आहे.चित्ररथाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असलेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती आणि शक्तीचा संदेश देणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत.
या चित्ररथावरील राज्यातील संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या भगवान श्री विठ्ठलाची कटेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची राजस, सुकुमार मूर्ती अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा संतवाणी हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.
चित्ररथाच्या दोन्ही बाजुंना श्री विठ्ठलाच्या निस्सीम भक्त संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत शेख महंमद, संत नरहरी महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबाकाका, संत एकनाथ महाराज, संत सेना महाराज, मंगळवेढ्यातील संत दामाजीपंत, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या.
याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतान नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या या पथसंचलनामध्ये मंगळवेढ्यातील संताला मान मिळाला ही कौतुकाची बाब असून भविष्यात येथील संताचा महिमा देशपातळीवर जाण्याच्या दृष्टीने पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाने देखील मदत करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरपालिकेने दिला आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, चोखोबाच्या स्मारकासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. परंतु काहीच्या हट्टापायी स्मारकाचा प्रश्न रखडलेला आहे. सध्याच्या सरकारने तीर्थक्षेत्र विकासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज