टीम मंगळवेढा टाईम्स।
लग्न म्हटलं की विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात अन पती-पत्नीच्या संसाराची सुरुवात होऊन दोघेही सुखी संसाराची स्वप्न रंगवतात.
अशात याच नात्याचा विश्वासघात झाल्याची घटना घडली असून पैसे घेऊन बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत गोपाळ देविदास साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाबाई हणमंत वाघमारे , श्रावण हणमंत वाघमारे दोघेही रा . उंदरी ता . मुखेड जि . नांदेड , उषा बालाजी हांडे रा . अहमदपूर जि . लातूर , तुकाराम आगलावे पाटील , सुमन आगलावे पाटील दोघेही रा.घन्सी तांडा उदगीर जि . लातूर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गोपाळ देविदास साळुंखे यांच्या लग्नासाठी दत्तात्रय मधुकर भोसले यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर त्यांनी उषा बालाजी हांडे हीचा बायोडेटा पाठवून दिला होता.
मुलगी पसंत असल्याने १९ सप्टेंबर रोजी गोपाळ व उषा यांचे लग्न लावण्यात आले. या लग्नाला मुलीची आई म्हणून गंगाबाई हणमंत वाघमारे, वडील म्हणून तुकाराम आगलावे पाटील, भाऊ म्हणून श्रावण हणमंत वाघमारे व सुमन आगलावे पाटील यांच्यासह ८ ते १० लोक उपस्थित होते.
धक्कादायक बाब म्हणजे सदरचे लग्न लावून देण्यासाठी गोपाळ साळुंखे यांनी कमिशनपोटी १ लाख ६५ हजार रुपये लग्नाच्या अगोदर दिले होते. लग्नानंतरच आठ दिवसानंतर रजिस्टर लग्नाची नोंद करू असे गोपाळ साळुंखे याने पत्नी उषा हिस सांगितले होते.
दरम्यान २७ सप्टेंबर रोजी नववधू उषा ही पायातील जोडवी पडल्याचा बहाणा करून ती शोधण्यासाठी जाते असे म्हणून कोणाला तरी फोन करून घरातून निघून गेली. त्यानंतर सुमारे अर्धा तास झाल्यानंतरही उषा घरी आली नाही म्हणून शेतामध्ये व इतर ठिकाणी शोधाशोध केली असता ती कोठेच दिसून आली नाही.
दरम्यान घरातील लोकांना कपाटात ठेवलेले ट्रान्सपोर्टच्या व्यवसायातील अडीच लाख रुपये मिळून आले नाहीत . यामुळे नवविवाहीत उषा हीनेच कपाटातुन पैसे चोरुन नेले असल्याची खात्री झाली . त्यानंतर साळुंखे यांनी सांगोला बसस्थानक , रेल्वे स्टेशन , पंढरपूर बसस्थानक व रेल्वेस्टेशन परिसरात शोधाशोध केली, मात्र ती मिळून आली नाही.
त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास गंगाबाई वाघमारे हिस मित्राचे लग्न करावयाचे असल्याचा बायोडाटा पाठवून नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे बोलावून घेतले. यावेळी गोपाळ साळुंखे यांनी गंगाबाईकडे पत्नी उषा बद्दल विचारणा केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविल्यानंतर गंगाबाई वाघमारे हिने मी तुमचे घेतलेले परत करते , तुम्ही पोलीसात तक्रार करू नका असे सांगितले.
याप्रकरणी गोपाळ साळुंखे यांनी गंगाबाई हणमंत वाघमारे , श्रावण हनमत वाघमारे दोघे रा . उंदरी ता . मुखेड जि . नांदेड , उषा बालाजी हाडे रा . अहमदपुर जि . लातुर, तुकाराम आगलावे पाटील , सुमन आगलावे पाटील दोघेही रा.घन्सी तांडा, उदगिर जि. लातूर यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज