टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर शहरातील विस्थापित नगरातील एका घरात भयंकार स्फोटत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मयुरी अक्षय मेनकुदळे (वय 24) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता याबाबत पोलीस शोध घेत होते.
अगोदर फटाक्याचा स्फोट झाल्याज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान मिक्सरच्या स्फोटाने महिलेचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नेमका स्फोट कशाने झाला? याचा शोध घेण्यासाठी पुणे येथील न्याय वैधक पथकाला खास पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयुरी मेनकुदळे यांनी मंगळवारी (ता. 2) सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास आपल्या घरातील मिक्सर चालू केला. काही वेळातच मिक्सरचा स्फोट झाला.
या स्फोटात मयुरी मेनकुदळे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.
स्फोटाचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पुणे येथील न्याय वैधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपासणी नंतरच स्फोट कशाने झाला हे समजू शकणार आहे. दरम्यान स्फोटाची तीव्रता इतकी होती की एक किलोमीटर अंतरापर्यंत आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
यापूर्वी फटाक्याच्या स्फोटात चार महिलांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये मागच्या वर्षी फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला होता. यात अनेक कामगार आगीच्या भक्षस्थानी सापडले. या अपघातात चार कामगारांचा मृत्यू झाला होता.
बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली होती. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या फॅक्टरीमध्ये सुरक्षा उपाय फक्त नावालाच असल्याचे समोर आले होते. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तर घरातही फटाके तयार करत असल्याची माहिती आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज