मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातलं असून जूनपासून आजपर्यंत पावसाच्या विविध कारणाने 84 जणांचा बळी गेलाय, अनेकांची घरं वाहून गेली, हजारो घरांची पडझड झाली आहे. राज्यभर नुकसान पाहणी दौरे सुरू असून पंचनामे सुरू आहेत.
दरम्यान, अतिवृष्टी आणि महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. केवळ आठ दिवसांच्या आत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही मदत संबंधित कुटुंबांच्या खात्यावर जमा झालेली आहे.
राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केलं असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत थेट अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरी उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरासाठी 37 हजार
शासनाच्या निकषांनुसार पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विविध प्रकारच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाईल.
दुधाळ जनावर दगावल्यास 37,500 रुपये, ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये आणि लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची तरतूद आहे. तर शेळी, मेंढी, बकरे आणि डुक्कर दगावल्यास प्रत्येकी 4,000 रुपये दिले जाणार आहेत. मोठ्या जनावरांची मर्यादा तीन तर छोट्या जनावरांची मर्यादा 30 इतकी ठेवण्यात आली आहे.
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील मदतीची घोषणा करण्यात आली असून प्रति कोंबडी 100 रुपये या दराने एका कुटुंबाला जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. घरांची पडझड झाल्यास झोपडीसाठी 8,000 रुपये तर पक्क्या घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी 12,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. याशिवाय गोठ्यासाठी 3,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी काय तरतूद?
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठीही शासनाने भरपाईची रूपरेषा जाहीर केली आहे. कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रती हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे.
पूरामुळे जमीन करून गेल्यास दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनींसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर, तर दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी किमान 5,000 रुपये आणि कमाल 47,000 रुपये प्रती हेक्टर अशी मदत मिळणार आहे.
सांगोल्यातील 4 कुटुंबियांना 16 लाखांची मदत
सांगोला तालुक्यातील या चारही मृत्यूंसाठी एकूण 16 लाख रुपयांची मदत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाठवण्यात आली होती. त्यापैकी तीन कुटुंबीयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली आहे. चौथ्या कुटुंबाला लवकरच मदत मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अतिवृष्टी आणि महापुरात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तातडीने आर्थिक सहाय्य दिल्यामुळे दुःखाच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील माहीम येथे असणाऱ्या कासाळ ओढ्यात तन्मय रविकिरण ऐवळे (वय :7 ) व सोमनाथ विठ्ठल ऐवळे (वय:13 ) या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता . या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाखांची शासकीय मदत बँक खात्यात जमा झाली आहे .आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही मदत तहसील सांगोला येथून देण्यात आली आहे.(स्रोत:abp माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज