टीम मंगळवेढा टाईम्स ।
महायुती सरकारच्या प्रचंड विजयानंतर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यावेळी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
आपण नाराज नाही, आपण रडणारे नाहीत तर आपण लढणारे आहोत, घरात बसून राहणारे नाही. मला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्यातील जनतेने दिलेली ‘लाडका सख्खा भाऊ’ ही पदवी महत्वाची आहे,
असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे संकेत दिले. तसेच आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह असल्याचे सांगत पुढील वाटचाल त्यांच्या निर्णयानुसार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यांना सरळ सांगितले, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या, त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. आता उद्या अमित शाह यांच्यासोबत आमची बैठक होणार आहे
या बैठकीत तिन्ही पक्षांचे नेते असणार आहे. त्यात सविस्तर चर्चा होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा निर्णय गुरुवारी अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम होणार असल्याचे संकेत मिळाले.
त्यानंतर शुक्रवारी भाजपच्या विधिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात येणार आहे. या बैठकीत निवडण्यात येणारा नेताच राज्याचा पुढील मुख्यमंत्री असणार आहे, असे संकेत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले
आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. आता निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता महायुतीचे सरकार स्थापन करायचे आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे.
एनडीएचे आम्ही घटक आहोत. त्यामुळे एनडीएचे नेते जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असणार आहे. आमचे पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला असणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगत पुढील मुख्यमंत्री ते नसणार असल्याचे संकेत दिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज