टीम मंगळवेढा टाईम्स ।
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिया यांच्यातील टी20 विश्वचषकमधील शेवटचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. या विजयानंतर भारतीय संघाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दुसरा दिग्गज खेळाडू विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी काल सामन्यानंतर टी20 इंटरनॅशनलमधून निवृ्त्तीची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या वृत्तावर काही क्रिकेट प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे त्यांना टी20 इंटरनॅशनलमधून खेळताना बघायला मिळणार नाही याचं दु:ख अनेकांना होतंय. पण असं असलं तरी अनेकांकडून त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील रोहित शर्मा आणि विराट कोलही यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देत दोघांचं कौतुक केलं आहे.
“योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा. योग्यवेळी घेतलेली निवृत्ती योग्य आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. ही गोष्ट चांगली आहे की, एका विशिष्ट काळानंतर आपला फॉर्म स्टॉप होऊ शकतो. त्याचवेळेला निवृत्तीचा निर्णय घेणं ती वेळ योग्य असते. ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.
त्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. आता सगळ्यांनी संधी मिळावी या हेतूने त्यांनी निवृत्ती घेतली. माझ्या मते त्यांनी योग्य निर्णय घेतला”, असं शरद पवार म्हणाले.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांना उधाण येण्यामागचं कारण देखील तसंच आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात ज्या घडामोडी घडल्या ते पाहता शरद पवार यांनी आज निवृत्तीबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर चर्चा होणं साहजिकच आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे शरद पवार यांना उद्देशून राजकारणातून आता निवृत्त घ्यावी, असं म्हटलं होतं. पण दुसरीकडे शरद पवार निवृत्ती घेण्यास तयार नाहीत.
राजकारण आणि समाजकारण हाच शरद पवार यांच्या जीवनाचा आत्मा आहे. त्यामुळे त्यांनी निवृत्तीची घोषणा केली नाही. याउलट ते परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले.
त्यांनी लोकसभेत आपली ताकद दाखवून देत 10 पैकी तब्बल 8 जागांवर आपल्या उमेदवारांना जिंकून आणलं. यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोलही यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर शरद पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज