टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरानजीक असलेल्या श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग मात्र टँकर देण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांसाठी संतापलेले सरपंच जमीर सुतार यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार पांडव यांना चांगलेच पाण्याच्या टँकर साठी धारेवर धरल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
श्री संत दामाजी नगर येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे नऊ हजार लोकसंख्या असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ आली आहे. संतापलेले नागरिक सरपंच जमिर यांना वारंवार टँकरची मागणी करीत आहेत.
परिणामी पाणीटंचाईमुळे येथील नागरिकांच्या घशाला कोरड पडत असल्याने यावर मात करण्यासाठी सरपंच जमीर सुतार यांनी गेल्या वीस दिवसापूर्वी येथील जि.प.पाणी पुरवठा विभागाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल केला होता.
येथील ग्रामपंचायतीला नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी दुसरी कोणतीही योजना नसल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा गरज निर्माण झाली आहे.
दामाजी नगर साठी आंधळगाव व इतर तीन गावासाठी असलेल्या प्रादेशिक नळ पुरवठा योजनेचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. प्रशासनाने आंधळगावला टँकर सुरु केला मात्र उर्वरीत तीन गावच्या पाण्याबाबत त्यांनी विचार न केल्याने जनतेचे पाण्याअभावी बेहाल होत आहेत.
दामाजी नगर ग्रामपंचायतला या योजनेचे पाणी मिळण्यास विलंब लागणार आहे. अधिकारी मात्र टँकर देण्याऐवजी या योजनेच्या आड दडून येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
दामाजी नगरला पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी येथील सरपंच जमीर सुतार यांनी पाणी पुरवठा विभागाला अनेक वेळा उंबरठे झिजवले. मात्र तेथील अधिकार्यांना अद्यापही टँकरसाठी पाझर फुटला नसल्याचा सरपंच यांचा आरोप आहे.
सरपंच जमीर मुजावर यांनी उपअभियंता पांडव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तुमच्या गावाला प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असल्याने टँकर देण्यास अडचण असल्याचे सांगितले.
परंतु सरपंचांनी योजना अपूर्ण असल्याने तोपर्यंत टँकर सुरू करा अशी मागणी केली असता सर्वे करण्यास निवडणुकीच्या कामामुळे वेळ नसून त्या कामातून सवड मिळाल्यास सर्वे केला जाईल असे सांगितले.
त्यामुळे सरपंच सुतार यांनी टँकरसाठी प्रस्ताव देऊन 20 दिवस झाले तरी अद्याप सर्वे झाला नाही पाण्याचा टँकर मिळाला नाही त्यामुळे त्रस्त नागरिकांना आपल्या ऑफिस कडे घेऊन येतो असे म्हणताच टँकर सुरू करण्याची माझी एकट्याची जबाबदारी नाही असे म्हणत पांडव यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी सरपंच सुतार यांनी पांडव यांना चांगले धारेवर धरले व त्यानंतर तहसीलदार मदन जाधव यांना या प्रकाराची माहिती दिली व तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी केली असता जाधव यांनी संबंधित अधिकार्याला योग्य त्या सूचना देतो असे सांगितले.
निवडणूक कामाचे कारण देत वेळ मारून नेली जात आहे
सध्या पाणीटंचाईने नागरिक त्रस्त असून नागरिकांना पाणी देण्याबाबत प्रशासनाकडून निवडणूक कामाचे कारण देत वेळ मारून नेली जात आहे. नागरिकांना जर पाणीच नाही मिळाले तर जनता मतदान करायला ते कसे येतील याचा प्रशासनाने विचार करावा व तातडीने टँकर सुरू करावा. -जमीर सुतार, सरपंच संत दामाजी नगर,मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज