टीम मंगळवेढा टाईम्स ।
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी
या १८ गावांना टेल टू हेड प्रमाणे पाणी मिळण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आपली मागणी लावून धरली होती.
आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणीवर सकारात्मकता दर्शवून हे पाणी संबंधित मंगळवेढा तालुक्यातील गावांना देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक सांगली येथे पार पडली होती.
सदर बैठकीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका
क्रमांक -२ अन्वये तरतूद असणारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी करण्यात यावे अशी मागणी केली होती.
त्या बैठकीमध्ये आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन टेल टू हेड अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना या पाण्याची तरतूद करण्याचे सांगली व सोलापूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले होते.
त्या बैठकीच्या अनुषंगाने आ आवताडे यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये आपली मागणीपर भूमिका मांडताना सांगितले की, सदर पाण्यासाठी सांगली व सातारा यांच्यामध्ये चढाओढ सुरु आहे. त्यामुळे या योजनेतील मंगळवेढा तालुक्याचे हक्काचे पाणी आमच्या तालुक्याला मिळणे नितांत गरजेचे आहे.
अगोदरच दुष्काळी तालुका असा कलंक असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे पाणी तालुक्याला मिळणे अतिशय गरजेचे असल्याचेही आमदार अवताडे यांनी यावेळी सांगितले.
या योजनेअंतर्गत आमदार आवताडे यांच्या मागणीची व मंगळा तालुक्याच्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा पाणी अनुषंगाने अन्याय न होऊ देता मंगळवेढा तालुक्यातील या योजनेच्या लाभार्थी गावांना पाणी देणार असल्याचे सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज