मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवीच्या रक्कमांचा अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी चेअरमन प्रथमेश कट्टे याची अगोदरच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली,
तर नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात व्यवस्थापक अविनाश ठोंबरे याला १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दरम्यान, अपहाराची रक्कम तसेच गुन्ह्याची व्याप्ती आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
१५ लाखांचे ३० लाख रुपये मिळवून देतो, असे सांगून प्रथमेश कट्टे याने फसवणूक केल्याप्रकरणी सुनिल भिसे यांनी या अगोदर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली होती.
मात्र, सुमारे दीड वर्षापासून तो फरार होता. त्यानंतर विशेष लेखापरिक्षक वर्ग – २ (सहकारी संस्था) बप्पाजी पवार यांनी चौकशी करून शुक्रवारी (दि.११) संकल्प पतसंस्था तसेच चेअरमन कट्टे, व्यवस्थापक ठोंबरे यांच्याविरूद्ध ३ कोटी ९३ लाख ७७ हजार रूपयांच्या अपहार प्रकरणी फिर्याद दाखल केली.
शहर पोलीस निरीक्षक अरूण फुगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत यांच्या पथकाने पुणे येथे छापा टाकून कट्टे व ठोंबरे यांना पकडून अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
कट्टे याला अगोदरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली. त्याला नवीन गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार असून रविवारी (दि. १३) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ठोंबरे याला नवीन गुन्ह्यात अटक करून ७ दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
न्यायालयाने त्याला १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. सरकार पक्षातर्फे तपास अधिकारी प्रशांत भागवत, सरकारी वकील डी.एम. शेख यांनी बाजू मांडली. आरोपी कट्टे याच्यावतीने अॅड. सागर आटकळे, तर ठोंबरे याच्यावतीने अॅड. विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले.
नव्याने दाखल फिर्यादीनुसार कट्टे व ठोंबरे यांनी संगनमताने एकूण ३ कोटी ९३ लाख रूपयांचा अपहार करून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. मात्र, चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अपहाराची रक्कम आणखी अनेक कोटींनी वाढण्याची तसेच कागदपत्रांचे बनावटीकरण करून कट्टे याने केलेली इतरही काही गंभीर प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. शनिवारी दिवसभरात कट्टे याचे कांही भागीदार, मित्र, गुंतवणूकदार यांना बोलावून चौकशी करण्यात आली.
परदेशी बँकांकडून कोट्यवधी रूपये मिळविण्याचा प्रयत्न
प्रथमेश कट्टे याने ‘संकल्प’च्या माध्यमातून प्रचंड परताव्याची अभिषे दाखवत कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्या रक्कमा हडप केल्या. एवढ्यावरही न थांबता त्याने अनेक बनावट कागदपत्रे करून चक्क परदेशातील बँकेकडून सुमारे ४० ते ५० कोटी रूपये कर्ज मिळविण्याचे प्रयत्न केले. हे प्रकरण अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ठेवीच्या रक्कमांसाठी तगादा लावणाऱ्या लोकांना तो पैशाचे आपले मोठे काम झाले असून त्यातून सर्वांचे पैसे देणार असल्याचे सांगत होता, असे पोलीस तपासातून समोर येत आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज