मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती.
अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सोलापूर, रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबई आणि ठाण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा लागल्यानंतर जिल्ह्यात सर्वदूर प्रथमच जोरदारपणे पावसानं हजेरी लावली. यामुळं शेतकऱ्यांची चिंता दुर होणार आहे. जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास या पावसाची मोठी मदत मिळणार आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस, हळद, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळणार आहे. तर जोरदार झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
वर्ध्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र नदी नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहेत. वर्ध्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. शेतकरी या पावसामुळे सुखावला असून आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसानंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी आहे.
तर समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीत लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत. या प्रकल्पातून 12.12 घनमीटर प्रतिसेंकदाने विसर्ग सुरु आहे. लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज