टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ‘ई-चलान’द्वारे दंड केला आहे. त्यात शहरातील सव्वा लाख, तर ग्रामीणमधील जवळपास दीड लाख वाहनचालकांचा समावेश आहे.
10 तारखेपर्यंत त्यांना स्वतःहून दंडाची रक्कम भरता येणार होती. मुदतीत दंड न भरल्यास संबंधितांवर न्यायालयाच्या माध्यमातून दंडवसुलीची कारवाई केली जाणार आहे. त्यासंबंधीची नोटीस पावणेतीन लाख वाहनधारकांना पाठवली आहे.
सोलापूर जिह्यातील विविध रस्त्यांवरून प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. कधी मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, तर कधी मोबाईलवर बोलत वाहन चालवले जाते.
लेन कटिंग, हेल्मेट नाही, दुचाकीकरून ट्रिपल सीट प्रवास करणे, असेही प्रकार सातत्याने सुरू आहेत. त्या वाहनधारकांना इंटरसेप्टर वाहनांद्वारे ‘ई-चलान’च्या माध्यमातून ऑनलाइन दंड केला जातो. सोलापूर शहर पोलिसांनी एक लाख 21 हजार 694 वाहनांवर तशी कारवाई केली आहे.
कारवाई होऊनही प्रलंबित दंड न भरणाऱयांवर आता न्यायालयात खटला भरला जाणार आहे. त्यासंबंधीची नोटीस त्या सर्वानाच पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर पाठवली आहे.
आज 11 फेब्रुवारीला लोकअदालतीतून त्यांनी दंड भरणे आकश्यक आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी त्यांना कुठेही दंड भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
जिह्यातील प्रलंबित प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा काढण्याच्या उद्देशाने आज 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी दिली.
जिल्हा न्यायालयासह जिल्हाभरातील सर्वच न्यायालयांमध्ये लोकअदालत पार पडेल. त्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे 25 हजार, तर दाखलपूर्व खटल्यांची संख्या 28 हजारांपर्यंत आहे.
वाहनधारकांना प्राप्त झालेले ‘ई-चलान’च्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून त्यातूनही दंड ऑनलाइन भरता येतो. ‘महाट्रफिक चलान’द्वारेही दंड भरण्याची सोय आहे.
वाहतूक शाखेचे कार्यालय किंवा रस्त्यांकरील काहतूक पोलीस हवालदारांकडील मशीनद्वारेदेखील दंड भरता येतो. वाहतूक पोलिसांकडील ई-चलान डिव्हाईसद्वारे डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येईल.
वाहतूक पोलिसांकडील ‘ई-चलान’ मशीनमधील क्यूआर कोड स्कॅन करून व ‘महाट्रफिक ऍप’वरूनही दंडाची रक्कम भरण्याची सोय असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी दिली.
महामार्गांवरील वाढत्या अपघातांमागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱया वाहनांवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई मोहीम सुरू आहे.
जानेवारीच्या 31 दिवसांत 2 हजार 171 वाहनांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केले आहे. जानेवारी महिन्यात पुणे, तुळजापूर, हैदराबाद, मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर व अन्य राष्ट्रीय महामार्गांवर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणाऱ्या 2 हजार 171 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहेत. या वाहनांना 43 लाख 39 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
सोलापुरातून जाणारे सर्वच रस्ते चांगले झाल्याने वाहनधारक वेगात वाहने चालवत आहेत. दररोज शेकडो गाडय़ा वेगमर्यादेचे पालन करीत नसल्याने स्पीड गनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांनी वेग पाळावा, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज