टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मदत मात्र , केवळ चार तालुक्यातील काही शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी या चार तालुक्यातील बाधित २८ हजार ६६ शेतकऱ्यांसाठी ४० कोटी ५३ लाख ४८ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.
सोलापूर जिल्ह्याला जूनपासून आतापर्यंत पावसाने चांगलेच झोडपले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मात्र, जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यातील काही मंडलातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.
याबद्दल बाधित शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर , दक्षिण सोलापूर , अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यातील काही मंडलात एका दिवसात ६५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ केली आहे. हेक्टरची मर्यादाही दोन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आल्याचा शासन निर्णयही जाहीर झाला आहे.
परंतु सध्या अतिवृष्टीची दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आल्याने प्रशासनाचीही गोची झाली आहे. शासनाने घोषणा तीन हेक्टरपर्यंत केली असली तरी , प्राप्त निधी पाहता मदत मात्र , दोन हेक्टरपर्यंतच मिळणार आहे.
लवकरच तहसील कार्यालयाकडून पंचनामे झालेल्या भागांतील शेतकऱ्यांच्या याद्या मागवून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वी जिरायत पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८०० आर्थिक मदत होती.
आता ती १३ हजार ६०० रुपये करण्यात आली आहे. बागायती पिकांसाठी एका हेक्टरसाठी १३ हजार ५०० रुपयांची होती. ती मर्यादा वाढवून आता २७ हजार रुपये करण्यात आली आहे.
बहुवार्षिक पिकांसाठी पूर्वी १८ हजार रुपये हेक्टरी मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करून ३६ हजार रुपये करण्यात आले आहेत.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज