टीम मंगळवेढा टाईम्स ।
साताऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला. नेत्याचं कार्यकर्त्याप्रती असं प्रेम पाहून असंख्य कार्यकर्ते फिदा झालेत.
उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या तुफ्फान चर्चेत आहे. सोशल मीडियावर उदयनराजेंची ही कृती व्हायरल होत असून सामान्य लोकांकडूनही उदयनराजे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
तसेच उदयनराजेंनी ज्याला पेढा भरवला, तो कार्यकर्ता नेमका कोण आहे, यावरूनही चर्चा सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्त्यांमधील हे प्रेम चांगलंच चर्चेत आलंय.
खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्याला पेढा भरवला, त्या कार्यकर्त्याचं नाव विनोद मोरे आहे. उदयनराजे भोसले आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून हजेरी लावतात.
त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा देतात. साताऱ्यातील गोडोली येथे काल विनोद मोरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. विनोद मोरे हे उदयनराजेंचे चाहते आहेत.
यावेळी चाहत्याचं कौतुक करण्यासाठी उदयनराजेंनी त्यांना चक्क तोंडाने पेढा भरवला. त्यांनी व्यक्त केलेलं हे प्रेम पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजेंचा वाद
उदयनराजे भोसले यांच्यावर आमदार शिवेंद्र राजेंनी केलेली टीका सध्या चर्चेत आहेत.
उदयनराजे भोसले हे केंद्रात विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करतात. निवेदन देऊन शेकडो कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून आणतात.
पण ते खरोखरच किती निधी आणतात… हे खरंच कामं करत असतील तर मागील लोकसभा निवडणुकीत जनतेने यांना पराभूत का केले, असा खोचक सवाल शिवेंद्र राजे भोसले यांनी केलाय.
2019 मध्ये शिंवेंद्र आणि उदयनराजे हे दोघेही भाजपात साताऱ्यातून अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढले. मात्र शिवेंद्र राजेंचा विजय झाला तर उदयनराजेंचा पराभव झाला. त्यानंतर दोघांमध्येही कायम वाद होत असल्याचे पहायला मिलत आहे.
शिंदे सरकारच मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी उदयन राजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात शिवेंद्रराजेंना घेऊ नये, अशी विनंती केल्याची चर्चा झाली. मात्र मी जे काही करतो ते थेट करतो, असं वक्तव्य करत उदयनराजेंनी हे आरोप फेटाळून लावले.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज