टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात काहीना काही होतच असतं. आता सोलापूरच्या उजनी धरण धरणातील पाण्याच्या वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होताना दिसत आहे.
तर सोलापूरकरांचा विरोध डावलून या धरणाचे पाणी इंदापूर व बारामती तालुक्यास नेण्याची होत असल्याचे सांगत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
तसेच त्यांनी सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर आम्ही राज्यात रान पेटवू, असा इशाराही आ. प्रणिती शिंदे यांनी दिला होता.
त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पलवार केला आहे. तसेच पालकमंत्री बदलांच्या चर्चेवर उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.
बाजारातला भाजीपाला असतो काय?
सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नावरून सध्या राजकारण तापले असतानाच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री बदलाच्या चर्चा सोलापूरसह राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. त्यावर आता भरणे यांनी उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, पालकमंत्री बदलणे म्हणजे काय बाजारातला भाजीपाला असतो काय? पत्रकाराने जबाबदारीने बातमी दिली पाहिजे. पालकमंत्री बदलणे एवढे सोप्पे नसते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्याची, शहराची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी असते.
तर उजनी पाणी पळविण्याच्या आरोपावरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पलवार केला आहे. ते म्हणाले लाकडी निंबोळी योजना ही जुनीच आहे. उगाच अशा मुद्द्यावर राजकारण करु नये.
मंगळवेढा, बार्शीसाठीच्या योजनादेखील लवकरच मार्गी लागतील
तसेच लाकडी निंबोळी ही योजना नवीन असती तर निश्चित दोष माझा असता मात्र ही जुनी योजना आहे त्याला पैसे मंजूर करण्यात आले आहेत. तर या योजनेप्रमाणेच मंगळवेढा, बार्शीसाठीच्या योजनादेखील लवकरच मार्गी लागतील. त्यांना सुप्रमा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निवडणूक असताना राजकारण ठीक आहे. पण आता कशातच काय नसताना विनाकारण लोकांचा गैरसमज करणे हे काही लोकांचे कामच आहे. तर आंदोलन करुन, वातावरण तापवून स्वतः प्रकाशझोतात राहण्याचे काही लोकांचे काम सुरू असतेच.
गैरसमज झाला असावा
तर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीका आणि इशाऱ्याबद्दल बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, टीकाकारांनी अभ्यास करुन बोलावे. आ. प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाला असावा.
जसा तुमचा गैरसमज (पत्रकारांचा) झाला तसा त्यांचा पण गैरसमज झाला असावा. प्रणिती शिंदे या आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमदार असून अभ्यासू आहेत. तर शिंदे या शासनाच्या प्रतिनिधी असून त्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असेल त्यामुळे आता त्यांचा गैरसमज दूर झाला असेल असं मला वाटतं.
तर सोलापूरमधील पाणी प्रश्नावर बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरला चार दिवसाला पाणी पुरवठा होतो ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. समांतर जलवाहिनीचा प्रश्न येत्या 8 दिवसात निकाली काढला जाईल.
पंधरा महिन्यात समांतर जलवाहिनी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होईल. तर ज्या व्यक्तीला टेंडर दिले होते तो चुकीचा निघाला. त्याने अतिरिक्त पैशांची मागणी केली त्यामुळे त्याचे टेंडर रद्द करुन नव्याने टेंडर काढले आहे.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज