टीम मंगळवेढा टाईम्स ।
बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून दोघा सख्ख्या भावांनी तीन अनोळखी इसमांच्या मदतीने कंटेनर चालक संजय भगवान चव्हाण (वय ३०, रा.महमदाबाद, हुन्नूर, ता.मंगळवेढा) याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुहास जगताप व तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी माहिती दिली आहे.सांगोला पोलिसांनी २४ तासात गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून
या खुनातील आरोपी अनिल जकाप्पा पुजारी (वय २८) व सुनील जकाप्पा पुजारी (वय.२७, दोघेही रा.महमदाबाद, हुन्नूर, ता.मंगळवेढा) यांना अटक केली आहे.
या खून प्रकरणातील आणखी तीन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. अज्ञात कारणावरून पाच ते सहा अनोळखी इसमांनी संजय भगवान चव्हाण या कंटेनर चालकाचे अपहरण करून त्याच्या डोक्यात मारहाण करून खून केला होता.
तसेच पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचे प्रेत मोटरसायकलसह उदनवाडी ते चोपडी जाणाऱ्या रोडच्या कडेला दगडामध्ये टाकून दिल्याची घटना घडली होती.
भगवान बाबू चव्हाण रा.महमदाबाद ( हुन्नूर ) ता. मंगळवेढा यांनी अज्ञात पाच ते सहा इसमांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सांगोला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची वेगाने सूत्रे हलवली होती.
सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचे सांगोला पोलिसांपुढे आव्हान होते. मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर,
स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती.
दरम्यान तपास अधिकारी सपोनी हेमंतकुमार काटकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महमदाबाद (हन्नूर) येथील अनिल जकाप्पा पुजारी व सुनील जकाप्पा पुजारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संजय भगवान चव्हाण यांच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासात उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, पोलीस नाईक राहुल कोरे, पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलीस नाईक दत्ता वजाळे, पोलीस नाईक सचिन वाघ, पोलीस नाईक सिद्धनाथ शिंदे यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज