टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात जलसंधारण मंत्रीपद भूषवलेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण ते शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघाडीत त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते सध्या भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सातत्याने समोर येत आहे.
या चर्चांना काल प्रत्यक्ष दुजोरा मिळाल्याचे पहायला मिळाले. कारण आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जवळपास तासभर ताटकळत होते अशी चर्चा विधानभवनात रंगली होती.
त्यानंतर तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीने ते विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटल्याचे वृत्त आहे . त्यामुळे आमदार तानाजी सावंतांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने चांगलाच जोर धरल्याचे पहायला मिळाले.
उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आमदार तानाजी सावंत यांचे मागील अनेक दिवसापासून खटके उडत आहेत. त्यातच शिवसेने खासदार ओमराजेंना झुकते माप दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदार तानाजी सावंत हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार तानाजी सावंत आणि पालकमंत्री शंकरराव गडाख तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आक्रमक झाले होते.
या बैठकीत त्यांनी प्रशासकीय मान्यता न घेता 5 कोटींची बीले अदा करण्याला कडाडून विरोध केला होता . त्यामुळे खासदार ओमराजेंची चांगलीच गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
त्यानंतर मात्र आमदार तानाजी सावंत विरूध्द शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच यापुर्वी आमदार तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे ते राष्ट्रवादीच्या रडावर होते.
शिवाय भूम परांड्याची राष्ट्रवादीची जागा आमदार तानाजी सावंत यांनी हिसकावून घेतल्याने राष्ट्रवादीतूनही त्यांना विरोध होत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना मंत्रीपद मिळाले नाही अशीही चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे.
त्यामुळे आगामी काळात सावंत भाजपत गेल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. महाविकास आघाडीतील या एकंदरीत राजकारणाला कंटाळून आमदार तानाजी सावंत हे भाजपशी जवळीक वाढवत असल्याचे पहायला मिळत आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे भाजपत डेरेदाखल होण्याची दाट शक्यता आहे . शिवाय भाजपला ग्रामीण आणि सहकार क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी आमदार तानाजी सावंत यांची मदत होऊ शकते.
कारण सावंत यांच्याकडे साखर कारखाने आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. शिवाय मराठा समाजाचे नेते हा एक फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे भाजपदेखील त्यांना पक्षात घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान आमदार तानाजी सावंत यांच्या निकटवर्तीयांकडून भाजप प्रवेशाचा दावा फेटाळला जात आहे. आपल्या कारखान्याच्या संदर्भात फडणवीस – सावंत यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र सत्ताधारी पक्षाचा आमदार विरोधीपक्षनेत्याकडे कारखान्याच्या कोणत्या प्रश्नासाठी येतो हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.(स्रोत:द महापोस्ट न्यूज)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज