टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर महानगरपालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड या दोघांना सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिले आहेत.
यामुळे शहराच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडली आहे.राजेश दिलीप काळे (वय 41, रा. फ्लॅट नं. 101, गॅलक्सी अपार्टमेंट, वीरशैव नगर, जुळे सोलापूर) आणि चेतन नागेश गायकवाड (वय 20, रा. सेटलमेंट कॉलनी नं. 3, विठ्ठल मंदीराजवळ, सोलापूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर त्यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून निमयबाह्य पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरीक व व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणी करणे,
शासकीय अधिकारी व सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, सरकारी काम करणार्या अधिकारी-कर्मचार्यांना धाकधपाटा दाखविण्याच्या उद्देशाने
अंगावर जाणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. उपमहापौर काळे यांच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन याच्याविरुध्द खून, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गायकवाडवर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. काळे व गायकवाड याच्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी काळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्य होत्या.
त्यानुसार या दोघांनाही सोलापूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त श्रीमती डॉ. कडूकर यांनी दिले आहेत.(स्त्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज