टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर पोलीस दलात भरती होण्यासाठी एका तरुणाने भलताच प्रताप केला आहे. स्वत:ची शारीरिक उंची वाढवण्यासाठी संबंधित तरुणाने पोलीस भरती प्रक्रियेत तोतयागिरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला आहे. संबंधित तरुणाने केलेलं कृत्य पाहून पोलीसही चक्रावले आहेत. संबंधित आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रभुराम प्रकाश गुरव असं गुन्हा दाखल झालेल्या 31 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील रहिवासी आहे.
याप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर पोलीस दलासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती.
यासाठी 29 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात शारीरिक चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या मैदानी चाचणीसाठी आरोपी प्रभुराम गुरव देखील आला होता. पोलीस भरतीसाठी 165 सेंटिमीटर उंचीची अट आहे. पण संबंधित आरोपी गुरव याची उंची काही सेंटिमीटर कमी होती.
त्यामुळे त्याने स्वत:ची शारीरिक उंची वाढवण्यासाठी डोक्यावर चक्क विग घातला होता. उंची वाढवण्यासाठी तरुणाने केलेला प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
याप्रकरणी पोलीस हवालदार अंकुश ठोसर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत तोतयागिरी करणे, भरती प्रशासनाची फसवणूक करणे अशी विविध कलमाअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज