टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला नव्याने कर्ज देण्यासाठी सर्वच वित्तीय संस्थांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होण्याचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी मागील काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून कारखाना सुरू करावा असे आवाहन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी केले आहे.
या निमित्ताने संचालक मंडळातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मागील चार दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे संचालक मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत पवार यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, विठ्ठल साखर कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही मार्ग काढून कारखाना सुरु करता येईल का, या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक घेतली.
या बैठकीत पवार यांनी कारखाना सुरु व्हावा, यासाठी राज्य सहकारी बॅंकेला मदत करण्याची विनंती केली, त्यानुसार बॅंकेने कर्जाचे पुनर्गंठण करण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय इतर बॅंका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही बॅंक तयार झाली आहे.
परंतु कारखाना सुरु करण्यासाठी लागणारा 70 ते 80 कोटींचा निधी कसा उपलब्ध करणार, असा प्रश्न पवार यांनी बैठकीत उपस्थित केला होता. त्यावर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी ठोस भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. परंतु ते या संदर्भात काहीच बोलले नाहीत, त्यामुळे कारखाना सुरु होईल का नाही, हे आता भालकेंनीच स्पष्ट करावे.
मागील काही महिन्यांपूर्वी कारखाना सुरु करण्यासाठी मी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी भालके यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून इतर वित्तीय संस्थांकडून निधी घेऊन कारखाना सुरु करतो, असे संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर सांगितले होते.
कारखाना सुरु करण्यासंदर्भात भगिरथ भालके यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील अद्याप कारखाना सुरु करण्यासंदर्भात त्यांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही.
अजूनही वेळ गेलेली नाही, भालके यांनी स्वतःची मालमत्ता तारण म्हणून बॅंकेला देवून कर्ज काढून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांचे पैसे द्यावेत आणि यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु करावा. त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची माझी तयारी असल्याचेही पाटील यांनी या वेळी स्पष्टपणे सांगितले.
भगिरथ भालकेंना खुर्चीचा मोह सोडवत नाही : दीपक पवार
मागील हंगामात गाळप केलेल्या उसाची एफआरपी थकीत आहे. थकीत एफआरपी दिल्याशिवाय हंगाम सुरु करता येणार नाही. हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानासुध्दा कारखान्यातील अतंर्गत कामे अजूनही ठप्प आहेत.
ऊस तोडणीसाठी लागणारी यंत्रणा भरली नाही, ऊस वाहतुकीचे करार केले नाहीत. कारखान्याकडे कोणतीच यंत्रणा नाही, तरीही भगिरथ भालके हे कारखाना सुरु होणार असल्याचे कोणत्या तोंडाने सांगत आहेत, असा सवाल उपस्थित करत भालकेंना खुर्चीचा मोह सोडवत नाही असा टोला राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लागवला (स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज