टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली, परंतु नकार दिल्याने तिचा अनन्वित छळ केला. पत्नीस करोना संसर्ग झाल्यानंतर तिचा जाणीवपूर्वक मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यातील लिंगराज दामू पवार, (रा. तुकाई नगर, मंगळवेढा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश कमल बोरा यांनी फेटाळला.
आरोपी लिंगराज पवार याचा विवाह २००५ साली उमा शंकर चव्हाण, (रा. सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर अश्विनीला मुलगी झाली. यामुळे लिंगराज याने तिच्याकडे थेट घटस्फोटाची मागणी केली.
मात्र पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याने त्याने तिचा मानसिक छळ आणि मारहाण सुरू केली.
एप्रिलमध्ये पहिल्या आठवडय़ात अश्विनीला करोनाचा संसर्ग झाला. परंतु त्याने तिच्यावर उपचार होऊ दिले नाहीत. सासू-सासरे व शेजारच्या मंडळींनी तगादा लावल्यानंतर मंगळवेढा येथील डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने सोलापूरला नेण्यास सांगितले.
मात्र यावेळीही त्याने टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. काही दिवस गेल्यावरही आरोपीने पत्नीला विजापूरला उपचारासाठी नेताना वाटेत भर उन्हात वाहनात ताटकळत ठेवले. पुढे डॉक्टरांनी तिला बेळगाव येथे हलवण्यास सांगितले, मात्र आरोपीने मुद्दाम विलंब केला. अखेर अश्विनीचा मृत्यू झाला.
अश्विनी हिची आई उमा शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
या जामीन अर्जास प्रखर विरोध करणारे मूळ फिर्यादीचे वकीलपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. सारंग वांगीकर , मूळ फिर्यादीतर्फे अॅड. धनंजय माने, अॅड. जयदीप माने, अॅड. सिध्देश्वर खंडागळे तर आरोपीतर्फे अॅड. मुल्ला यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज