टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर बुधवारी सोलापूर येथे दगडफेक करण्यात आली होती. गोपीचंद पडळकर हे राज्यभरात घोंगडी बैठका घेत आहे. सोलापूरमध्ये घोंगडी बैठका घेण्यासाठी ते गेले होते.
त्यावेळी त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेनंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी काल रात्री ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता.
यानंतर आता स्वत: गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला
हल्ल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असं या दगडफेकीचं वर्णन पडळकर यांनी केलं आहे.
अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता, ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका सुरूच राहणार… असं पडळकर यांनी म्हटले आहे. या ट्विट सोबत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार व त्यांच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा थेट रोख रोहीत पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांवर केली होती टीका
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत.
प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल…
घोंगडी बैठका सुरूच राहणार… pic.twitter.com/909jRWb389
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 30, 2021
त्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांचा डीएनए बहुजन विरोधी असल्याचंही ते म्हणाले होते. पडळकर यांनी केलेल्या या टीकेमुळेच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असावी, अशी चर्चा आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज