टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरात घोंगडी बैठकीला आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले असून, पोलीस अज्ञात व्यक्तीचा तपास करीत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दगडफेक करणारा युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.
दिवसभरात त्यांनी शहरातील विविध भागांत घोंगडी बैठका घेतल्या. दुपारी भवानी पेठ येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पडळकर हे सायंकाळी या परिसरात आले. त्यांची गाडी मंदिराजवळ येताच गर्दीतून अज्ञात व्यक्तीने दगड फेकून मारला.
हा दगड गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या काचेवर पडला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. बैठकीला परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळे पोलीस घटनास्थळी होते. पोलिसांनी तत्काळ गर्दी कमी केली. दगड नेमका कोणत्या दिशेने आला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी बैठक न घेण्याची विनंती केली त्यामुळे पडळकर यांनी तेथील आयोजकांकडून सत्कार स्वीकारला आणि पुढे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथून ते शासकीय विश्रामगृहावर गेले.
सोलापूर – Video : पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/ec2QbdqzVx
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2021
गोळ्या घातल्या, तरी घाबरणार नाही
माझा आवाज जर कोणी अशा पद्धतीने बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो बंद होणार नाही. मला जरी गोळ्या घातल्या तरी मी माझी भूमिका मांडणार आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन स्वत:ला पुरोगामी म्हणून सांगणाऱ्या नेत्याचे हे राजकारण असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.
उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही : गोपीचंद पडळकर
सोलापुरमध्ये भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना घडली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने त्याच्या गाडीवर दगडफेक केली. यानंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
मी स्वत: या संदर्भातील तक्रार देणार नाही. आज माझा आवाज बंद करण्यासाठी गाडीवर दगडफेक करणार असेल, याला मी भीती वगैरे दाखवावी असा गैरसमज झाला असेल, उद्या मला गोळ्या जरी घातल्या तरी मी विचारांपासून मागे हटणार नाही, असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
मड्डे वस्तीत झालेल्या बैठकीनंतर मी गाडीत बसलो. गाडी वीस पावलंही पुढे गेली नाही तर गाडीवर दगड टाकला आणि ते लोक पळून गेले. या ठिकाणी माझी कोणाशी ओळख नाही, शत्रूत्व नाही. ज्यांनी कोणी केलं असेल किंवा ज्यांना कोणी करायला लावलं असेल त्यांना राज्यातील लोकं जाणतायत, असं पडळकर म्हणाले.
राष्ट्रवादीचा असा पहिल्यापासूनचा उद्योग सुरू आहे. कोणालातरी पुढे करायचं आणि त्याचं चित्र वेगळं दाखवायचं. मला रोज त्यांचे फोन येतात, मेसेज येतात. परंतु मी त्यांना उत्तर देत नाही. हे कोणी केलं हे माहित नाही. पोलीस तपास करतील, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज