टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरगुती कारणावरून पत्नीवर चाकूने वार करून पतीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये पती जागीच मरण पावला असून जखमी पत्नीवरती सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत वैराग पोलिस ठाण्यामध्ये मृताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबतची वैराग पोलिस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मथुरा उत्तम गाडे (वय 55) या शेतातून शेळ्यांसाठी चारा घेऊन आल्याने दमल्या होत्या.
थोडी विश्रांती घ्यावी म्हणून त्या घरासमोरील लोखंडी कॉटवरती झोपल्या होत्या.पती उत्तम शंकर गाडे (वय 65) हा गावातून घरी आला.
त्यावेळी घरगुती कारणावरून त्याने पत्नीच्या पोटावर व गळ्यावर लोखंडी सुरीने वार केले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. नंतर उत्तम याने स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा चिरून घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची तीव्रता इतकी अधिक होती की, उत्तम हा जागीच गतप्राण झाला. पत्नी गंभीर जखमी झाल्या. त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची फिर्याद त्यांच्या सुनेने वैराग पोलिस ठाण्यामध्ये दिली. या घटनेनंतर बार्शीचे पोलिस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर आणि वैरागचे पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी घटनास्थळी भेट दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज