सुहास घोडके ९४२३५९७४९८
सोलापूरकरांची जीवनदायिनी असलेल्या उजनी जलाशयातुन आधी बारामतीकर आणि आता इंदापूरकरांनी पाणी उचलले अशा आशयाची बातमी जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या कानावर आदळली अन् सोलापूरकरांचा घसाच ‘कोरडा’ पडला.
शेतकऱ्यांमधुन उद्रेकाची अन् संतापाची तीव्र लाट उसळली.
शेतकरी नेते आक्रमक झाले. यामुळे नाईलाजाने उरलं सुरलं अस्तित्व टिकविण्यासाठी “बारामती” मतदार संघावर “दगड” ठेवुन थोरल्या अन् धाकल्या साहेबांच्या आदेशाने जयंतरावांनी ‘तो’ आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र आज ४ दिवस उलटुन गेले तरी ‘रद्द’ बाबत कोणताच शासकीय अध्यादेश निघाला नाही. त्यामुळे आता ‘कुणाच्या हाताला लकवा भरलाय’ हा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत आहेच.
मात्र यापेक्षाही पुढे जावुन “सांडपाणी” हा शब्द वापरून जशी तुम्ही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली त्याप्रमाणे “रद्द” चा व्हिडीओ करुन सोलापुर करांची दिशाभूल करत असाल तर लक्षात ठेवा, सोलापूर जिल्ह्याची जनता हुशार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातुन राष्ट्रवादीचा एकही आमदार निवडून येणार नाही आणि होणाऱ्या नुकसानाला दस्तुरखुद्द बारामतीकर जबाबदारी असतील.
परवाच लिहल्याप्रमाणे केवळ शरदकन्येचा अडचणीत आलेला मतदारसंघ वाचविण्यासाठी अन् इंदापूरकरांना खुश करण्यासाठी नसत्या उठाठेवी करत सोलापूरकरांच्या स्वप्नांवर नांगुर फिरवुन उजनीचं पाणी इंदापूरला नेण्याचा असफल डाव आखला गेला.
सोलापूरकर खडबडुन जागे झाले. शेतकरी आक्रमक झाले. शेतकरी नेते हट्टाला पेटले अन् त्यामुळे कुठेतरी नरमाईची भूमिका घेत परवा जलसंपदा मंत्री जयंतरावांनी सोलापुरकरांच्या रेट्यापोटी ‘रद्द’ चा तोंडी आदेश काढला.
मुळातच सोलापूर जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पवार साहेब सांगे अन् सोलापूर जिल्हा हाले अशी कधीकाळी परिस्थिती होती. जिल्ह्यातील आमदार-खासदार राष्ट्रवादीचे, सहकारी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात… एवढंच काय..? अहो, राज्यातील रथी महारथी साहेबांना सोडुन गेल्यावर सोलापूर जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी साहेबांच्या पंखात दहा हत्तीचं बळ भरलेलं.
मग सोलापूरकरांचे एवढे उपकार साहेबांवर असताना साहेबांनी अन् दादांनी सोलापूरकरांच्या पाठीत ५ tmc चा खंजीर खुपसायला नको होता. ज्याप्रमाणे “मी सांगे अन् जिल्हा हाले” असं मानुन जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या गळ्यात घड्याळाचा पट्टा बाधुन लखोट्यात सांगितलेल्या नावाला शेपूट हलवुन परवानगी द्यायची त्यापद्धतीने मी सांगितले अन् ५ tmc पाणी पळविले तर जिल्ह्यातील शेतकरी शेपूट हलवुन शांत बसेल असा विचार तुमच्या मनामध्ये आला तरी कसा..?
असो, पंधरा-वीस दिवसाच्या उजनी पुराणाला परवा जयंत पाटलांनी ब्रेक लावला खरा पण आज ४ दिवस झाले या रद्दबाबत शासकीय अध्यादेश निघाला नाही. राज्याला आठवतंय, साहेबांच्या एका वक्तव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीबाबांना हाताला लकवा भरला होता. त्यामुळे ‘पुछता है सोलापूरकर’ आता कुणाच्या हाताला लकवा भरलाय..? आणि कुणाच्या सांगण्यानुसार भरलाय..?
तर एक आठवण अशी की, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन म्हणून रणजितदादा विराजमान होते आणि २००९ च्या वेळी सोलापूर जिल्ह्याचा विकास व्हावा, जिल्हा बारामती सारखा सुजलाम् सुफलाम् व्हावा म्हणून माढा लोकसभा मतदार संघातुन दस्तुरखुद्द साहेब उभारणार असल्याचे त्यांनी सांगताच पत्रकारांनी प्रश्न केला की ‘म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा विकास मोहिते-पाटलांच्यानं होणार नाही असंच का..?’ यावर मोहिते पाटलांकडे उत्तर नव्हते.
अर्थात २००९ ला दस्तुरखुद्द साहेब माढा मतदारसंघातुन निवडून आले आणि साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचा इतका विकास केला… जिल्ह्याला इतकं सुजलाम् सुफलाम् केलं… जिल्ह्याला इतकं विकासाच्या शिखरावर पोहचवलं की साहेबांना २०१९ च्या वेळी इथल्या हुशार व सुज्ञ जनतेने “माढा : शरद पवारांना पाडा” म्हणूनच जयजयकार केला होता.
त्यामुळे एकूणच सांगण्याचं तात्पर्य असं की, उजनी सोलापूरची आहे. उजनी वर फक्त सोलापूर जिल्ह्याचा अधिकार आहे. त्यावेळी आम्ही ठिगळ लावलेल्या चड्डीवर फिरत होतो त्यामुळे मराठवाड्याला पाणी आमच्या बापजाद्या गुलामांनी दिलं. ते मुग गिळुन शांत बसले. आज आम्ही कडक इस्त्रीची पॅन्ट घालतो त्यावर स्टार्च केलेला शर्ट अन् जमल्यास इनशर्ट करतो. त्यामुळे आता उजनीचं पाणी लाल झालं तरी बेहत्तर.
मात्र आम्ही एक थेंब देखील कुणाला देणार नाही. आणि हा आदेश रद्द झाला नाहीच तर सोलापूरकर हुशार आहेत. दस्तुरखुद्द तुम्हाला “पाडा” म्हणून जयजयकार करु शकतात, तर “आमचं बी ठरलंय” तुम्ही पाणी घेवुनच दाखवा. उजनीच पाणी तर लाल हुणारच. पण जिल्ह्यातुन एकही आमदार निवडून येणार नाही हि आम्हा सोलापूरकरांची शपथ आहे !!
(सदरचा लेख हा ‘सुहास घोडके’ यांनी लिहला आहे.)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज