टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे हे अंदाजे 1 हजार 209 मातांनी आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान पंढरपूर तालुक्यातील मतमोजणी संपली असून आवताडेंना पंढरपूर तालुक्यातुम मोठे मताधिक्य मिळाले आहे.
सुरुवातीला ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीस सुरवात झाली होती. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसात ते आठ वाजतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांना गुलाल उधळायला व जल्लोष करायला बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राकडे कोणालाही फिरकायला परवानगी नाही.
मतमोजणी केंद्रात कोव्हिड टेस्ट केलेला रिपोर्ट असेल व केंद्रात प्रवेशाची परवानगी घेतलेली असेल तरच प्रवेश दिला जात आहे.
मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्यातील 22 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे.
या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.
या मतदार संघाची एकूण मतदार संख्या 3 लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या.
तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.
या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला आज होणार आहे.
विजयी मिरवणूक काढल्यास होणार कारवाई
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विजयी मिरवणूक काढण्यावर निर्बंध आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. मतमोजणी केंद्राबाहेर व पंढरपूर शहर, मंगळवेढा तालुक्यामध्ये पोलिसांचा पुरेशा प्रमाणात बंदोबस्त राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल.
– तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज