कोरोना व्हायरसच्या लसीबाबत संबंधित शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने या लसीसंबंधी उपस्थित झालेल्या प्रश्नांची आणि उत्तरांची यादी जाहीर केली आहे.
सर्वसामान्यांच्या मनात कोरोना लसीबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात लस कधी उपलब्ध होईल? कोणती लस निवडली जाईल?
प्रत्येकाला ती मिळणार की नाही? लस घेणे अनिवार्य असेल? लस सुरक्षित आहे की नाही? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
कोविड लस कधीपर्यंत उपलब्ध होईल?
आरोग्य मंत्रालय : कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. भारत सरकार कोविड-१९ ची लस देण्याच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे.
सर्वांना एकाचवेळी लस मिळेल का?
आरोग्य मंत्रालय : भारत सरकारने लसीच्या उपलब्धतेनुसार काही गटांची निवड केली आहे. त्यांना पहिल्यांदा लस दिली जाईल. कारण ते अधिक असुरक्षित आहेत. पहिल्या गटात आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा समावेश आहे. दुसर्या गटात ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि कोरोनाबाधित लोक असतील.
लसीचे डोस किती वेळा घ्यावे लागतील?
आरोग्य मंत्रालय : लसीचे दोन डोस असतील. दोन्ही डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर राहील.
अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) कधी विकसित होतील?
आरोग्य मंत्रालय : लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर दोन आठवड्यांनी अँटिबॉडीजचा विकास व्हायला सुरवात होते.
कोणती लस भारतात येईल? आणि ती इतर देशांइतकी प्रभावी ठरेल का?
आरोग्य मंत्रालय : होय, भारतात येणारी लस इतर देशांइतकीच प्रभावी असेल.
लस घेणे बंधनकारक आहे का?
आरोग्य मंत्रालय : कोविड-१९चे लसीकरण ऐच्छिक असेल, पण स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे.
कमी कालावधीत चाचणी झालेली ही लस सुरक्षित असेल का?
आरोग्य मंत्रालय : नियामक संस्थेने लसीला मान्यता दिल्यानंतरच सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध होईल.
कोणती लस निवडली जाईल?
आरोग्य मंत्रालय : औषध नियामक संस्था लसीच्या चाचण्यांविषयीचा अहवाल तपासत आहे. अधिक सुरक्षित आणि प्रभावी असलेल्या लसीला परवाना दिला जाईल. मात्र, एकाच लसीचे संपूर्ण डोस घ्यावेत, दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊ नयेत.
नोंदणीशिवाय लस घेऊ शकतो का?
आरोग्य मंत्रालय : नाही, कोविड-१९ लसीसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तरच लसीचे ठिकाण आणि वेळ सांगण्यात येईल.
लसीकरणाची माहिती लाभार्थ्यास कशी मिळेल?
आरोग्य मंत्रालय : ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, संबंधितांना मोबाइल क्रमांकावर लसीकरण केंद्र आणि वेळेच्या माहितीबाबत एसएमएस पाठविला जाईल.
नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आरोग्य मंत्रालय : नोंदणीसाठी खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल
ड्रायव्हिंग लायसन्स,आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,मनरेगा कार्ड,खासदार/ आमदार/ विधानपरिषदेच्या सदस्यांची ओळखपत्रे,पॅन कार्ड,बँक/ पोस्ट ऑफिस पासबुक,पासपोर्ट,पेन्शन कागदपत्र,शासकीय कर्मचार्यांचे सर्व्हिस आयडी,मतदार ओळखपत्र
लसीकरण करण्यापूर्वी ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे का?
आरोग्य मंत्रालय : नोंदणीच्या वेळी वापरण्यात आलेले ओळखपत्र लसीकरणापूर्वी दाखवणे आवश्यक आहे.
ओळखपत्र नसेल तर?
आरोग्य मंत्रालय : संबंधित व्यक्तीला लसीकरण झाले आहे का, याची नोंद ठेवण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे.
कोविड -१९ लसीचे दुष्परिणाम काय आहेत?
आरोग्य मंत्रालय : सुरक्षितता सिद्ध झाल्यानंतरच लस दिली जाईल. काही लोकांना ताप, वेदना यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
लस साठवण्याची क्षमता भारतामध्ये आहे का?
आरोग्य मंत्रालय : भारत हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवणारा देश आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज