माचणूर । प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीपात्रातून 141 गोण्यातून 20 हजार रुपये किमतीची वाळू नेण्यासाठी अवैधरीत्या साठा केल्याप्रकरणी विजय कृष्णा सरवळे, अमित संजय नांदे, बंडा राजाराम कांबळे (सर्व रा. माचणूर) या तिघांविरुद्ध वाळू चोरी व पर्यावरणाचा र्हास केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार, 7 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान माचणूर येथील भीमा नदीच्या पात्रात या तिघा आरोपींनी 141 गोण्यामधून 20 हजार रुपये किमतीची वाळू नेण्यासाठी नदीपात्रात भरून ठेवली होती.
या दरम्यान फिर्यादी तथा तलाठी विनोद बनसोडे यांना भ्रमणध्वनीवरून कोतवाल संजय कुरवडे यांनी नदीपात्रात तिघेजण वाळू भरत असल्याचे कळविले.
फिर्यादी तत्काळ चारचाकी वाहनाने माचणूर येथे हजर होऊन त्यांनी मिलिंद शिवशरण, भास्कर शिवशरण, दिनकर डोके, अतुल पाटील यांना समक्ष घेऊन पाहणी केली.
यावेळी वाळूने भरलेली गोणी दिसली. हा वाळूसाठा जवळपास चार ब्रासचा असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मंगळवेढा मंडल अधिकारी सोमनाथ जाधव यांना सदर ठिकाणी बोलावून घेऊन त्या वाळूचा पंचनामा केला.
सदर जप्त वाळू सकाळी 8 वा. तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना आरोपींनी अरेरावीची भाषा वापरल्याचे तलाठी विनोद बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज