कोरोना व्हायरसने राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्याला मंगळवेढा तालुकाही अपवाद नाही. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली असली तरी सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी अनेक नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.
मात्र, सध्या अनेकजण विना मास्क फिरताना दिसत आहेत. याला आळा बसावा म्हणून प्रशासानाने दंड आकारला आहे. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. मंगळवेढ्यात आता विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात व मंगळवेढा तालुक्यात कोरोना व्हायरसमुळे अनेकजण प्राणाला मुकले आहेत.तरीदेखील बऱ्याच लोकांना कोरोना व्हायरसचे गांभीर्य नाही, असे स्पष्ट दिसून येते.
लोकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरावा म्हणून यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यांवर 100 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. मात्र, 100 रुपये दंड बऱ्याच जणांना किरकोळ वाटत आहे. त्यामुळेच मास्क किंवा रुमाल वापरण्याचे प्रमाण फारच कमी दिसून येत आहे, असा अंदाज प्रशासनाने लावला आहे.
मास्क किंवा रुमाल न वापरल्यामुळे दुसऱ्याला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, याचे गांभीर्य बऱ्याच जणांना नसल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी 24 ऑक्टोबरला नव्याने आदेश काढला आहे.
यामध्ये तोंडाला मास्क किंवा रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार मंगळवेढ्यातील नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरावा; अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल, असा इशारा ज्योतिराम गुंजवटे यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज